सुधीर मुनगंटीवारांचे विनोदी कार्यक्रम ठेवले तर लोक गर्दी करतील;राऊतांचा टोला

- Advertisement -
shivsena-mp-sanjay-raut-on-bjp-sudhir-mungantiwar-devendra-fadanvis-saamana
shivsena-mp-sanjay-raut-on-bjp-sudhir-mungantiwar-devendra-fadanvis-saamana

मुंबई: भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी तीन महिन्यात राज्यात भाजपाचं सरकार येईल असा दावा केला आहे. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला असून सुधीर मुनगंटीवारांचे विनोदी कार्यक्रम ठेवले तर लोक गर्दी करतील असं म्हटलं आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी सरकार पुढील तीन वर्ष मजबुतीने काम करेल असा विश्वास व्यक्त केला.

“अधिवेशनात विरोधी पक्षाने उत्तम कामगिरी केली. खरं खोट काय ते नंबर बघू…ही विरोधी पक्षाची भूमिका पुढील साडे तीन वर्ष त्यांनी उत्तम प्रकारे वठवावी. सुधीर मुनगंटीवार यांनी पुढील तीन महिन्यात सरकार येईल असं म्हटलं आहे. चांगला विनोद करतात ते…लवकरच महाराष्ट्रातील चित्रपटगृह सुरु होत आहेत.

आत्ताच मला काही प्रमुख नाट्य निर्मात्यांचा फोन आला होता. त्यांना काही सूट हवी आहे. मला काही गरज वाटत नाही, सुधीरभाऊंचे असे विनोदी कार्यक्रम ठेवले तर लोक गर्दी करतील,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

- Advertisement -

 “सरकार पुढील तीन वर्ष मजबुतीने काम करेल. सुधीर मुनगंटीवार किंवा भाजपाने त्याबाबत चिंता करु नये. उत्तम विरोधी पक्षाची भूमिका ते निभावत असून त्यांनी त्यात कायम राहावं,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

पुढे ते म्हणाले की, “कधी कधी खलनायकसुद्धा सिनेमा पुढे घेऊन जातो. नायकासोबत खलनायक सुद्धा ताकदीचा लागतो. आम्ही जेव्हा सिनेमा पाहायचो तेव्हा प्राण, शक्ती कपूर, अमरीश पुरी, निळू फूले, राजशेखर असे अनेक होते. त्यांच्यावर सुद्ध सिनेमा चालत असे.

महाआघाडी असल्याने हा महासिनेमा आहे. देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार यांच्यासारखे कलाकार असतात. त्यांनी आपली भूमिका वठवली आहे. पुढील साडे तीन वर्ष या राज्यातील वातावरण खेळीमेळीचं आणि हसतमुख राहील”.

फडणवीसांनी सामनावर केलेल्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, “सामना वाचतात हे त्यांनी कबुल केलं. सामना वाचणं सुंदर सवय आहे. महाराष्ट्र, देशात सत्य काय घडतंय त्याची माहिती सामनामधून मिळत असते. संपूर्ण जग सामनाची दखल घेतं. त्यामुळे देवेंद्रजींना चांगली सवय लागली असेल तर मी त्यांचं कौतुक करतो”.

- Advertisement -