Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeपश्चिम महाराष्‍ट्रपुणेडॉ. श्रीराम लागू यांच्या पार्थिवावर शुक्रवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

डॉ. श्रीराम लागू यांच्या पार्थिवावर शुक्रवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

shriram lagoo imagesपुणे: ज्येष्ठ ख्यातनाम अभिनेते नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांच्या पार्थिवावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. लागू यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे आदेश राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी काढले. उपसचिव उमेश मदन यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम यांना पत्राद्वारे तशी सूचना केली आहे. दरम्यान, लागू यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी बालगंधर्व रंगमंदिर येथे शुक्रवारी सकाळी १० ते ११ या वेळेत ठेवले जाणार आहे.

नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांनी मंगळवारी अखेरचा श्वास घेतला. रंगभूमीचा सारा अवकाश व्यापून सशक्त भूमिका उभी करणारे आणि चित्रपटाचा संपूर्ण पडदा आपल्या संवेदनशील आविष्काराने व्यापणारे ख्यातनाम अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे मंगळवारी ९२ व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ‘लागू यांचे चिरंजीव आनंद अमेरिकेत आहेत. ते आल्यानंतर गुरुवारी डॉक्टरांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील,’ असे लागू कुटुंबीयांच्या वतीने सांगण्यात आले होते. मात्र, आनंद गुरुवारपर्यंत पुण्यात पोहचू शकत नसल्याने लागू यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येतील, असे लागू यांच्या पत्नी दीपा श्रीराम आणि कन्या डॉ. शुभांगी कानिटकर यांनी बुधवारी स्पष्ट केले. लागू यांचे पार्थिव दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments