फेरीवाल्यांवर होणा-या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारच – संजय निरुपम

- Advertisement -

मुंबई – सध्या मुंबईत फेरीवाल्यांच्या मुद्यावरुन जोरदार राजकारण सुरु आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने फेरीवाल्यांच्या विरोधात तर काँग्रेसने फेरीवाल्याच्या समर्थनाची भूमिका घेतली आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी बुधवारी पुन्हा एकदा फेरीवाल्यांची बाजू उचलून धरली. फेरीवाल्यांच्या पोटाचा विचार करण्याचे त्यांनी आवाहन केले. 

५० वर्ष जुन्या फेरीवाल्यांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यास त्यांनी सांगितले. पोलीस, महापालिकेच्या कारवाईविरुद्ध आवाज उठवणारचं असे त्यांनी सांगितले. एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर मनसेने रेल्वे स्थानक परिसरात बसणा-या फेरीवाल्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ठाणे आणि मुंबईतील विविध रेल्वे स्थानकत मनसेच्या कार्यकर्त्यांनी हिंसक आंदोलन करुन फेरीवाल्यांना पळवून लावले होते. त्यामुळेच दादरसह मुंबईतील काही रेल्वे स्थानकांनी सध्या मोकळा श्वास घेतला आहे.

राज ठाकरेंच्या फेरीवालाविरोधी भूमिकेनंतर संजय निरुपम यांनी फेरीवाल्यांची बाजू उचलून धरली. मुंबईत फेरीवाल्यांना कुठेही धंदा करु द्यावा यासाठी संजय निरुपम यांनी दाखल केलेली याचिका  मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. फेरीवाल्यांना मुंबईसह राज्यभरात त्यांच्यासाठी आखून दिलेल्या फेरीवाला क्षेत्रातच आपला व्यवसाय करता येईल असे मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले.
रेल्वे स्थानकापासून १५० मीटर अंतरावर फेरीवाले बसू शकत नाही हे न्यायालायने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून होणा-या मारहाणीविरोधात मुंबई काँग्रेसने फेरीवाला सन्मान मोर्चाची हाक दिली होती. फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ एकनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं दादरमध्ये मोर्चा आयोजित केला होता. मात्र, या मोर्चाला सुरुवात होण्याआधीच मनसे कार्यकर्ते काँग्रेस कार्यकर्त्यासोबत भिडले. मोर्चादरम्यान दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं. मात्र यामुळे काँग्रेसचा मोर्चा सुरु होण्याआधीच आटोपला.

- Advertisement -