राज ठाकरे मेट्रो सिनेमागृहाकडे रवाना, कार्यकर्त्यांसह नागरिकांची तुफान गर्दी

- Advertisement -

ई- रेल्वे प्रवाशांच्या न्याय हक्कांसाठी सरकार व रेल्वे प्रशासनावर राग व्यक्ती करण्यासाठी आता थोड्याच वेळात रेल्वे मुख्यालय चर्चगेटवर राज ठाकरे धडक मोर्चा काढत आहेत. राज ठाकरेंच्या या मोर्चाला मुंबई पोलिसांनी अद्याप परवानगी दिली नाही. मात्र मनसे मोर्चा काढण्यावर ठाम आहे. राज ठाकरे मेट्रो सिनेमागृहाकडे रवाना झाले आहेत. तेथे आधीच कार्यकर्त्यांनी व सामान्य नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांची या मोर्चाला मूकसंमती आहे, मात्र मनसेच्या वतीने कायदा व सुव्यवस्था बिघडवली जाणार नाही या अटींवर या मोर्चाला संमती दिल्याचे सांगितले. राज ठाकरे रेल्वे ट्रॅकवर उभे राहून भाषण करणार आहेत.

राज ठाकरेंनी आजच्या मोर्चासाठी मोठी ताकद लावली असून ते मुंबईसह नाशिक, पुणे, ठाणे आदी भागातून पक्षाच्या ताकदीचा उपयोग करून घेतल्याचे दिसत आहे. आज सकाळपासून नाशिक-पुण्याहून अनेक मनसैनिक मुंबईच्या दिशेने धावत आहेत. हा मोर्चा मेट्रो सिनेमापासून सुरु होईल तो चर्चगेट रेल्वे स्टेशनवर थांबेल. या मोर्चाचे नेतृत्त्व खुद्द राज ठाकरे करतील.

- Advertisement -

किड्या- मुंग्यांसारखं मरणार की आपल्या न्याय हक्कासाठी रेल्वे मुख्यालयावर धडक देणार असे भावनिक आवाहन करत राज यांनी मुंबईकरांना मोर्चात सहभागी व्हावे अशी हाक सोशल मिडियाद्वारे दिली होती. त्याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे. याशिवाय मुंबईतील मनसे पदाधिका-यांनी तीनही लाईनवर जाऊन रेल्वे गाड्यातील प्रवाशांना या मोर्चात सामील होण्याबाबत साद घातली होती.

मागील आठवड्यात 29 सप्टेंबर रोजी एलफिन्स्टन-परेल रेल्वे पुलावर चेंगराचेंगरी होऊन 23 जणांचा मृत्यू झाला होता. तर 30 हून अधिक लोक जखमी झाले होते. यानंतर राज ठाकरेंनी रेल्वेच्या समस्यांबाबत आपला राग व्यक्त करण्यासाठी मोर्चा काढण्याचे जाहीर केले होते. सोबतच हा राग व्यक्त करण्यासाठी राज यांनी मुंबईकरांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले होते.

- Advertisement -