Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्या‘अब आँखो में आँखे डालकर बात होगी’ कधी?; शिवसेनेचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

‘अब आँखो में आँखे डालकर बात होगी’ कधी?; शिवसेनेचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

मुंबई: गलवान खोऱ्यातील रक्तरंजित लष्करी संघर्षापासून चीनच्या सीमेवरील कुरापती सुरूच आहेत. त्यातच आता चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी करत अरुणाचल प्रदेशमध्ये गाव वसवल्याची माहिती समोर आली. सॅटेलाईटनं टिपलेल्या दृश्यातून ही बाब समोर आली असून, विरोधकांकडून मोदी सरकारला जाब विचारला जात आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या पाठोपाठ आता शिवसेनेनंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या ‘अब आँखो में आँखे डालकर बात होगी’ विधानांची आठवण करून देत सवाल केला आहे.

सीमा भागात चीनने एक अख्खे गाव वसवले

अरुणाचल प्रदेशात चीननं वसवलेल्या गावावरून नवा वाद उभा राहण्याची चिन्हं आहेत. चीनच्या या धाडसी पावलाबद्दल विरोधकांकडून कारवाई करण्याची मागणी मोदी सरकारकडे केली जात आहे. “अरुणाचल प्रदेशातून येणारी चीनच्या नव्या घुसखोरीची बातमी धक्कादायक व हिंदुस्थानच्या चिंतेत भर घालणारी आहे. हिंदुस्थानी हद्दीत घुसून अरुणाचल प्रदेशातील सीमा भागात चीनने एक अख्खे गाव वसवले आहे.

हे सगळे एक रात्रीत घडले नाही. मग आता प्रश्न असा पडतो की, आपल्या हद्दीत चीन नवीन गाव उभारत असताना आपले प्रधान सेवक, चौकीदार वगैरे म्हणवणारे शक्तिशाली सरकार काय करत होते ? एखाद्याने आपल्या गावात साधे एका घराचे बांधकाम करायचे ठरवले तरी दगडविटा, सिमेंट, स्टील, वाळूचे ढिगारे आणावे लागतात.

मालवाहतुकीची वर्दळ सुरू होते आणि कोणाचे बांधकाम सुरू आहे याचा बोभाटा गावभर होतो. इथे तर एकदोन घरे नव्हे, अख्खे गावच उभे राहिले, पण ना हाक ना बोंब! कितीतरी इमारती उभ्या राहिल्या, पक्क्या घरांची बांधकामे झाली. बांधकामाचे साहित्य येऊन पडत होते, पण आपल्या केंद्रीय सरकारला याची कानोकान खबर लागली नाही,” अशी शंका शिवसेनेनं उपस्थित केली आहे. सामना अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या जशास तसे उत्तर देण्याच्या धोरणाची आठवण करून देत टोला लगावला आहे.

“हिंदुस्थानच्या हद्दीत एक नवीन गाव वसवले. असे एकच गाव वसवले की अशा आणखी दोन-तीन गावांचे निर्माण केले याविषयी अजून स्पष्टता यायची आहे. हिंदुस्थानचे परराष्ट्र मंत्रालयच यावर प्रकाश टाकू शकेल. दुर्दैव असे की, लडाखमध्ये गलवान खोऱ्यात चिन्यांनी घुसखोरी केली तेव्हा चिनी सैनिक आपल्या हद्दीत घुसलेच नाहीत असा दावा मोदी सरकारने केला होता. तो चिन्यांच्या पथ्यावरच पडला.

कारण गलवान खो-यातील घुसखोरीचा चीन सरकारने आधीच इन्कार केला होता. बदनामी टाळण्यासाठी आपल्या सरकारची प्रारंभिक भूमिकाही तीच असल्यामुळे चीनचे फावले आणि त्यांनी गलवान खोऱ्यात आपले बस्तान मजबूत केले. आता अरुणाचल प्रदेशात चीनने नवीन गाव वसवल्याच्या तक्रारी सॅटेलाईट चित्रांसह सरकारदरबारी पोहोचल्या आहेत.

चीनने उभारलेल्या गावाचा समोर आलेला धडधडीत पुरावा

चीनने उभारलेल्या गावाचा समोर आलेला धडधडीत पुरावा पाहून कुठल्याही सार्वभौम देशातील नागरिकाच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. प्रश्न इतकाच आहे की, जनतेच्या मनातील ही आग सरकारच्या मस्तकात जाणार आहे काय? हिंदुस्थान सरकारच्या वतीने अद्याप तरी अरुणाचलमधील चिनी गावाबद्दल निषेधाचा खलिता किंवा प्रतिक्रिया उमटलेली नाही,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

हिंदुस्थानचे लचके तोडण्याचे काम चिन्यांनी चालवले

“पाकिस्तानवर केलेले सर्जिकल स्ट्राइक किंवा पुलवामा हत्याकांडानंतर पाकिस्तानवर केलेले एअर स्ट्राइक याचे पुरेपूर भांडवल आणि मार्केटिंग करणारे चिन्यांच्या नवीन घुसखोरीबाबत मिठाची गुळणी धरून बसणार नाहीत, अशी जनतेला अपेक्षा आहे.

एखादा मजबूत वाडा घुशींनी पोखरून काढावा तशीच घुसखोरी करून हिंदुस्थानचे लचके तोडण्याचे काम चिन्यांनी चालवले आहे. ते किती काळ सहन तरी करायचे? ‘अब आँखो में आँखे डालकर बात होगी’, असे एका ओळीचे परराष्ट्र धोरण खुद्द पंतप्रधान मोदी यांनीच जाहीर केले आणि ते गाजलेही खूप.

त्याच विधानाला जागून हिंदुस्थानात चिनी गाव उभारणाऱया चिन्यांविरुद्ध पंतप्रधान नक्कीच एखादा ‘मास्टरस्ट्रोक’ मारतील, अशी आशा करायला काहीच हरकत नाही. अरुणाचल प्रदेशातील चिनी गावावर हातोडा कधी घालणार?,” असा सवाल शिवसेनेनं पंतप्रधान मोदींना केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments