Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याशिवसेनेचा भाजपावर हल्लाबोल; एकटेच लढणार जिंकणार ही चंद्रकांत पाटलांची खुमखुमी चांगलीच जिरली

शिवसेनेचा भाजपावर हल्लाबोल; एकटेच लढणार जिंकणार ही चंद्रकांत पाटलांची खुमखुमी चांगलीच जिरली

मुंबई l विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला दणदणीत यश मिळाले आहे. तर भाजपला केवळ एकच जागेवर समाधान मानावे लागले. यानंतर एकटे लढून दाखवा असे आव्हान चंद्रकांत पाटलांनी दिले होते. यानंतर शिवसेनेने पाटलांवर निशाणा साधला. चंद्रकांतदादा म्हणतात, आम्ही एकटे लढलो म्हणून हरलो. ते खरे आहे, पण आम्ही सर्वशक्तिमान आहोत व एकटेच लढणार व जिंकणार ही खुमखुमी त्यांचीच होती. ती चांगलीच जिरली आहे. असे म्हणत शिवसेनेने सामना अग्रलेखातून त्यांच्यावर खरमरीत टीका केली आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेची महाविकास आघाडी एकत्र लढली यापेक्षा एकदिलाने लढली हे महत्त्वाचे. भाजप-शिवसेना एकत्र लढत होते तेव्हा शिवसेनेची टांग खेचण्यासाठी जागोजागी गुप्त बंडखोर उभे करून भाजप खेळ बिघडवत होता. आता तिघांत तसे झाले नाही. यापासून धडा घ्यायचा आहे तो भाजपने, असेही शिवसेनेने म्हटले आहे.

महाविकास आघाडीचे सरकार हे अनैसर्गिक आहे, त्यांना जनतेचा पाठिंबा नाही असे बोलणाऱयांनी शिक्षक-पदवीधरांनी दिलेल्या निकालाकडे जाड भिंगाचा चष्मा लावून पाहावे.

वर्षभरापूर्वी 105 आमदार येऊनही सत्ता गेली. तेव्हापासून महाराष्ट्र भाजपास सुतक लागले. कालच्या नागपूर-पुण्यातील पराभवाने आणखी एक सुतक लागले. एका वर्षात दोनदा सुतक लागणे हे हिंदू शास्त्रानुसार चांगले नाही. भाजपला काहीतरी तोड करावीच लागेल. असा टोलाही शिवसेनेने भाजपला लगावला आहे.

नागपूर व पुण्यातील भाजपचा पराभव ही बदललेल्या वादळी वा-याची चाहूल आहे. वा-याने एक दिशा पकडली आहे व राज्यातील साचलेला, कुजलेला पालापाचोळा उडून जाणार आहे.

नागपुरातील पराभव धक्कादायक आहे, तितकाच पुण्यातील पराभवही भाजपसाठी ‘आत्मक्लेश’ करून घ्यावा असाच आहे. असा खोचक टोला शिवसेनेने लगावला.

महाराष्ट्रातील भाजप लोकांपासून, समाजातील सर्वच घटकांपासून दूर जातो आहे. पक्ष संघटना अंतर्गत कलहाने जर्जर झाली आहे. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या हाती भाजपची सूत्रे आहेत.

ही दिल्लीश्वरांची इच्छा, पण जनतेची इच्छा काय ते नागपूर, पुणे, संभाजीनगरच्या पदवीधर व शिक्षकांनी दाखवून दिले आहे. पदवीधर-शिक्षक मतदारसंघातही ‘जात’ हाच आधार मानून उमेदवाऱया दिल्या. भाजपला त्याची किंमत चुकवावी लागली. असेही शिवसेनेने म्हटले आहे.

पदवीधर, शिक्षक मतदारसंघ म्हणजे भारतीय जनता पक्षाचीच मक्तेदारी होती. शिकले-सवरलेले, सुशिक्षित, सारासार विचार करणारे मतदार हे भाजपलाच मतदान करतात या भ्रमाचा भोपळा आता फुटला आहे. असे म्हणत शिवसेनेने भाजपला सुनावले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments