Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमराठवाडाऔरंगाबादरडणारे कधीच लढू शकत नाही; उध्दव ठाकरेंचा भाजपला टोला

रडणारे कधीच लढू शकत नाही; उध्दव ठाकरेंचा भाजपला टोला

Uddhav Thackeray Massia,Uddhav, Thackeray, Massia,Aurangabad,CM,Chief Minister,Uddhav Thackerayऔरंगाबाद : जागतिक मंदी आहे, देशात मंदी आहे. पण त्यामुळे रडत बसणे योग्य नाही, लढलं पाहिजे. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार आहे. पण शेतकऱ्यांना चिंतामुक्त केलं पाहिजे. स्वागताला लाल गालिचे असतात पण त्याखाली अडचणीचे काटे असतात, कोंडी फोडली पाहिजे. रडणारे कधीच लढू शकत नाही, लढणारे रडत नाही, असा टोला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भाजपला लगावला.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते आज गुरुवारी औरंगाबाद शहरातील कलाग्राम येथे अॅडव्हॅनटेज महाराष्ट्र या महाएक्स्पोचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी उद्योगाच्या वाढीसाठी सरकार कटीबद्ध असल्याचं नमूद केलं. तसंच उद्योगांची जबाबदारी मी घेतो, पण इथल्या आमच्या भूमीपुत्रांना सांभाळण्याची जबाबदारी तुम्ही घ्या, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी स्थानिकांना रोजगाराची संधी देण्याचं आवाहन केलं.

आजपर्यंत इच्छा असूनही अधिकारांची ताकद आपल्याकडे नव्हती ती आता मिळाली आहे. आम्ही उद्योजकांना पूर्वीचे विरोधी सरकार वाईट असल्याचं सांगायचो, पण आता सांगता येणार नाही. आता आम्हाला काम करुन दाखवावं लागेल, संकटावर मात करावी लागणार आहे. माझे आजोबा सांगायचे संकटांच्या छाताडावर चालून जा, ते जमलं पाहिजे, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडली.

आंतराष्ट्रीय प्रदर्शन भरवता येईल असं केंद्र मी तुम्हाला बनवून देईन. मी नुसतं फीत कापायला आलो नाही तर मी तुमचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेन, तुमच्या अडचणी दूर केल्या तर तुम्ही मोठी झेप घ्याल. मी तुमच्या अडचणी दूर करेन, असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं.

या प्रदर्शनात सगळं आहे, शेती, एलईडी लाईट, फूड प्रोसेसिंग सगळं आहे. कृषी आणि उद्योग या दोन खात्यांच्या संगनमताने आपल्याला काही करता येईल का याचा मी प्रयत्न करतो आहे. कृषी आणि उद्योगांची मी सांगड घालण्याचा प्रयत्न करत आहे”, असं उद्धव ठाकरेंनी नमूद केलं.

यावेळी औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री संजय बनसोडे, एमआयएमचे  खासदार इम्तियाज जलील, शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे उपस्थित होते.

तर संपूर्ण जगाची बाजारपेठ आपण जिंकू शकतो

मेड इन इंडियाचं स्वप्न आपल्याला पडलं पाहिजे. बुद्धिमतेचा योग्य वापर आपण करू शकलो तर संपूर्ण जगाची बाजारपेठ आपण जिंकू शकतो. तुमच्या अडीअडचणी मला कागदावर लिहून दिल्या. उद्योजकांची यादी आपल्याला घ्या, कोकोणत्या खात्याकडून त्यांना मदत करु शकतो ते आपण पाहू. एलईडी या स्टॉलवर नको तर काळोख असलेल्या घरात उजेड करण्यासाठी मला एलईडी दिवे हवे आहेत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

बिडकीन येथे ५०० एकरवर अन्नप्रक्रिया उद्योग केंद्र उभारणार आहोत. त्यात १०० एकर जमीन महिला उद्योगांसाठी राखीव असावी अशी माझी इच्छा आहे. भूमीपूजनाच्या पाट्या जागोजागी दिसत असतील, पण तसं आपल्याकडे होणार नाही. उद्योगांची जबाबदारी मी घेतो, पण इथल्या आमच्या भूमीपुत्रांना सांभाळण्याची जबाबदारी तुम्ही घ्या,  असं आवाहन उद्धव ठाकरेंनी उद्योजकांना केलं.

यावेळी औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री संजय बनसोडे, एमआयएम खासदार इम्तियाज जलील, शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे उपस्थित होते. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे दोन दिवसीय औऱंगाबाद दौ-यावर आहेत. शहरातील विकासकामांचा आढावा घेत आहेत. महाएक्सपो कार्यक्रमानंतर विभागीय आयुक्तालय, महापालिका दौरा आणि इतर कामांचा आढावा ते घेणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments