Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याभाजपाकडून काँग्रेसचे आमदार फोडण्याचे प्रयत्न : काँग्रेस

भाजपाकडून काँग्रेसचे आमदार फोडण्याचे प्रयत्न : काँग्रेस

Vijay Wadettiwar BJP attempts to break Congress MLA
मुंबई : भाजप स्वबळावर सत्ता हस्तगत करण्यासाठी काँग्रेसचे आमदार फोडण्याचे प्रयत्न करत आहेत. आमच्या आमदरांना प्रलोभनं दाखवली जात आहे. असा आरोप काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

आमदारांच्या फोडाफोडीबद्दल वडेट्टीवार यांनी सांगितले की, आमदार फुटीची आम्हाला अजिबात भीती नाही, आमचे ४४ शिलेदार आपल्या ठिकाणीच आहेत. आमच्या आमदारांशी काहीजण संपर्क साधत आहेत. उद्या बळजबरी करणे, धाक दाखवणे, धमकावणे हा प्रकार निश्चितच होऊ शकतो. यासंदर्भात आम्ही राज्यपालांना भेटणार आहोतच. २५ वर्षांपासूनचा असलेला त्यांचा मित्रपक्ष हे सांगत असेल की, सत्ताधारी धमकावत आहेत. भाजपाकडून धमक्या येत आहेत. फोडाफोडीचं राजकारण होईल. तर निश्चितपणाने त्यांना जे वाटतं आहे, तेच आमच्याही लोकांच्या संदर्भात आहे.

आमच्याही लोकांकडे काही फोन गेलेले आहेत आणि तो प्रयत्न त्यांनी सुरू केला आहे. हा रडीचा डाव आहे. आता सध्या आमच्या आमदारांशी संपर्क केला जात आहे. अशी माहिती आमच्या अनेक आमदारांकडून मिळत आहे. संजय राऊत जे म्हणत आहे , त्याप्रमाणे भाजपाकडून आमदारांना प्रलोभनं देणं, धमकावनं सुरू झालेलं आहे. नेमकी काय प्रलोभनं दिली जात आहेत, हे लवकरच उघड करू. ज्या ज्या गोष्टी ते बोलत आहेत, त्यांचा देखील खुलासा लवकरच होईल. आमच्या आमदारांना आम्ही सध्या कुठेही हलवणार नाहीत. पुढील परिस्थिती पाहून आमचे पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

वडेट्टीवार म्हणाले की, भाजप जे वागत आहे ते घटनाबाह्या वागत आहे. शिवसेनेचं भाजपा बद्दलचं जे म्हणनं आहे ते खरं आहे. कारण, आताच्या स्थितीत जेव्हा मी दोन्ही पक्षांचे वक्तव्य ऐकत होतो. त्यांच्या नेत्यांच्या मुलाखती बघत होतो. हे पाहता एकीकडे भाजपाने सत्तेतून माघार घ्यावी, अन्यथा मोठा पक्ष म्हणून सत्ता स्थापन करावी. नाहीतर थेट सांगून टाकावं की, आम्ही सत्ता स्थापन करत नाही. मात्र ते पुढेही जात नाहीत व मागे देखील येत नाहीत. केवळ त्यांनी सत्तेचं घोंगड भिजत ठेवलं आहे. आमच्या शिवाय कोणी नाही ही भूमिका लोकशाहीला धरून नाही, लोकशाहीच्या हिताची नाही व घटनेला धरूनही नाही.

भाजपा आता जे काही करत आहे, ते घटनाबाह्य करतं आहे, असा आमचा आरोप आहे. राज्यात जर राष्ट्रपती राजवट लागू होत असेल तर त्याला संपूर्णपणे जबाबदार भाजपा असणार आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी वडेट्टीवार ते बोलत होते. राज्यात जर राष्ट्रपती राजवट लागू झाली आणि शेतकऱ्यांची आता जी काही परिस्थिती आहे. ज्या परिस्थितीत शेतकरी जगतो आहे. या सर्व पापचं प्रायश्चित उद्या भाजपाला भोगावं लागणार आहे.

अवकाळी पावसामुळे शेतकरी आता उद्धवस्त झालेला आहे. मग सरकार स्थापनेसाठी आडेवेढे कशाला घ्यायला हवेत. भाजपाने शिवसेनेची वाट न पाहता सत्तास्थपनेचा दावा करायला हवा. नाहीतर थेट सांगाव की, आमच्याकडून होत नाही, आमचं संख्याबळ कमी आहे. त्यावेळी दुसऱ्याला संधी द्यावी. मग काय होईल ते दुसरे पाहतील. परंतु तसं न करता अडवणुकीचं धोरण भाजपाने ठरवलं आहे. म्हणूनच यासर्वासाठी जबाबदार भाजपाच आहे.काही केलं तरी भाजपाची सत्ता येणार नाही, राज्यात राष्ट्रपती राजवट आली म्हणजे भाजपा सत्तेपासून दूर गेली असंच होतं. आम्ही विरोधी पक्षाची भूमिका निभावणार आहे. म्हणून जबाबदारी भाजपा आणि शिवसेनेची आहे. ते जर अपयशी ठरत असतील तर त्यावेळी आमची भूमिका आम्ही ठरवू. असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments