राणेंची जिरली!

- Advertisement -

मंत्रीपदाच्या लालसेपोटी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले नारायण राणे यांचा तीन महिण्याचा कालावधी उलटला. मंत्रीपदाचे गाजर भाजपाकडून त्यांना मिळाले होते. परंतु अद्यापही मंत्रीपद न मिळाल्यामुळे अखेर राणे यांनी आपला रंग दाखवायला आज पासून सुरुवात केली. सहनशिलता संपण्याआधीच निर्णय घ्या,असा धमकीवजा इशारा भाजपा नेतृत्वाला दिला. यामुळे राणे यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याची खेळी सध्यातरी फसली असे चित्र आहे. राणे यांनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर महत्वाचे मंत्रीपद त्यांना मिळाले होते. परंतु सत्ता गेल्यामुळे मंत्रीपदासाठी हपापलेल्या राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर भाजपाच्या इशाऱ्यावर त्यांनी स्वत:चा महाराष्ट्र स्वाभीमानी पक्षाची स्थापना केली. पक्षाचा ते एकटेच अध्यक्ष असून त्यांनी एनडीएला पाठिंबा दिला. नारायण राणे यांना भाजप कोट्यातून मंत्री करणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वेळा सांगितले. त्यानंतर राणे यांनी मंत्रीपदाचा मुहूर्त स्वत:च जाहीर केला होता. मात्र जाहीर केलेल्या मुहूर्तावर राणे यांचा शपथविधी झालाच नाही. शिवाय विधानपरिषदेच्या झालेल्या पोटनिवडणुकीत राणे यांना उमेदवारीही नाकारण्यात आली. त्यामुळे राणे अधिकच अस्वस्थ झाले होते. यानंतर त्यांना संयमाने घेण्याचा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. मात्र आक्रमक झालेल्या राणे यांचा संयम आता तुटू लागला आहे. हे त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे. राणे यांचा आक्रमक स्वभाव असल्यामुळे ते वादग्रस्त विधाने करतात तसेच कोणत्याही पक्षात असले तरी त्यांचे कुणाशीही जमत नाही.राणे यांना शिवसेनेने भरभरुन दिले होते.शाखा प्रमुख पासून ते मुख्यमंत्रीपदापर्यंत त्यांना मान मिळाला होता. मात्र स्वभाव आणि पक्षात घुसमट होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि त्यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांच्यावर आरोप करुन शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आल्यानंतर काँग्रेसने त्यांना भरभरुन दिले होते. परंतु काँग्रेसने आपल्याला मुख्यमंत्रीपद द्यायला हवं होत ही सल राणे यांच्या मनात होती. राणे यांना मुख्यमंत्रीपदासाठी अंतर्गत विरोध होता त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री बनता आले नाही. सत्तेसाठी हपालेल्या राणेंनी स्वत:चा पक्ष स्थापन करुन भाजपा प्रणित एनडीशी घरोबा केला. नेते हे पदाचे लोभी असतात हे त्यांनी दाखवून दिले.भाजपाकडूनही त्यांना मंत्रीपदाचे आश्वासन आणि गाजर मिळाले. आता राणे यांचा संयम ढासळत चालला आहे. राजकारणात पेशन्स ठेवावे लागतात. मात्र राणे हे फटकळ स्वभावाचे आणि राग नियंत्रणात राहत नसल्यामुळे ते सध्या त्रस्त आहेत. भाजपाने त्यांना मंत्रीपद दिले तर शिवसेना सरकारमधून बाहेर पडेल अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. ज्या दिवशी राणे यांना मंत्रीपद दिलं त्या दिवशी राज्यातलं सरकार पडून जाईल. अशी अडचण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची झालेली आहे. परंतु राणे यांनी संयम ढवळू देऊ नये. अन्यथा सध्या परिस्थिती घर का ना घाट का? अशी परिस्थिती झालेली आहे.

वैदेही ताम्हण

मुख्य संपादक

- Advertisement -