सिन्हांचा ‘घरचा आहेर’ विचारमंथन करणारा!

- Advertisement -

महागाई, नोटबंदीवरुन भाजपा नेते यशवंत सिन्हा यांनी आक्षेप घेत सरकारला घरचा आहेर दिला. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाचा दर (जीडीपी) सातत्याने घसरत आहे. त्यामुळे आर्थिक मंदीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जीडीपीच्या घसरणीत नोटाबंदीचा घेतलेला निर्णय हा आगीत तेल ओतण्यासारखाच आहे, असा हल्लाबोल भाजप नेते आणि अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात मंत्री असलेल्या यशवंत सिन्हा यांनी नरेंद्र मोदी सरकारवर केला आहे. बऱ्याच अर्थतज्ञांनीही सरकारच्या नोटबंदीवर आक्षेप घेत चिंता व्यक्त केलेली आहे. यावेळी त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावरही निशाणा साधला. सिन्हा यांनी सध्याच्या आर्थिक मंदीसदृश्य परिस्थितीवरही चिंता व्यक्त केली. आपल्या अर्थमंत्र्यांनी अर्थव्यवस्थेला ‘चौपट’ करण्याचे काम केले आहे. यावर मी गप्प बसलो तर राष्ट्रीय कर्तव्य निभावण्यात मी अपयशी ठरेल. त्यामुळे आता मला बोलावेच लागेल, असे म्हणत त्यांनी जेटलींवरच थेट तोफ डागली.

पक्षाविरोधात बोलण्याचे धाडस करत नाहीत, असे लोक माझ्या बोलण्याने दुखावले जातील, हे मला ठाऊक आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. जे काही वातावरण आहे त्याच्यावर बोलण्याचे धाडस सिन्हा यांनी केले. अरुण जेटली या सरकारमधील सक्षम मंत्री असल्याचे मानले जाते. २०१४ मध्ये भाजप सरकारमध्ये अरुण जेटलींनाच अर्थमंत्रिपद दिले जाईल, असे बोलले जात होते. त्यांची पात्रता पाहता त्यांच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थ मंत्रालय, संरक्षण आणि कंपनी व्यवहार मंत्रालयाची जबाबदारी सोपवली होती, असेही ते म्हणाले. अर्थ मंत्रालयाचे काम किती कठिण आणि किचकट आहे याची मलाही जाणीव आहे. २४ तास काम करावे लागते. याचाच अर्थ ‘सुपरमॅन’ अरुण जेटलींनाही हे काम कठिण वाटले असेल, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. कच्चा तेलाच्या वाढत्या किंमती आणि बँकांच्या वाढत्या एनपीएवरही त्यांनी चिंता व्यक्त केली. खासगी गुंतवणुकीत घट आली आहे. गेल्या दोन दशकांत इतकी कमी गुंतवणूक कधीच झाली नव्हती. औद्योगिक उत्पादन खूपच घसरले आहे. कृषी क्षेत्र संकटात आहे. उत्पादन, रोजगार, सेवा आदी क्षेत्र संकटात आहेत. निर्यात ठप्प झाली आहे. जवळपास सर्वच क्षेत्रांची हीच परिस्थिती आहे, यावरही चिंता व्यक़्त केली.

नोटाबंदीचा निर्णय हे तर आर्थिक संकट असल्याचे सिद्ध झाले आहे. नोटाबंदीचा निर्णय खूपच चुकीच्या पद्धतीने लागू करण्यात आला. जीएसटीमुळे व्यापाऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. अनेक उद्योग बंद पडले. रोजगार क्षेत्रावर परिणाम झाला. लाखोंना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. आर्थिक विकास दरात त्यामुळे सातत्याने घट होत आहे. जीडीपी ५.७ टक्क्यांवर आला. गेल्या तीन वर्षांतील निचांकी नोंदवली. पण नोटाबंदीमुळे ही परिस्थिती निर्माण झाली नाही, असे सरकारच्या प्रवक्त्यांकडून सांगितले जाते. नोटाबंदीने तर या आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे, अशी टीकाही त्यांनी केली. सध्याच्या सरकारने २०१५ मध्ये जीडीपी मोजण्याच्या पद्धतीत बदल केले होते. आताच्या जीडीपीची जुन्या पद्धतीने गणना केली असती ५.७ टक्के असलेला आर्थिक विकास दर ३.७ टक्के किंवा त्याहून कमी असता, याकडे त्यांनी लक्ष वेधले. नोटबंदी नंतर देशातील परिस्थिती अत्यंत वाईट झालेली आहे. अशा वेळी बऱ्याच अर्थतज्ञांनी चिंता व्यक्त केलेली आहे. भाजपातील एक ज्येष्ठ माजी मंत्री जर भाजपाच्या मंत्र्यांच्या कामकाजाचे वाभाडे काढत असेल तर ही भाजपासाठी चिंतेची आणि आत्मचिंतनाची गरज आहे. सरकारने सगळ्या गोष्टींवर विचार करणे गरजेचे आहे.

- Advertisement -
- Advertisement -