Friday, April 26, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखसोनिया गांधी शिवाय कॉंग्रेसचे नेतृत्व करणार कोण?

सोनिया गांधी शिवाय कॉंग्रेसचे नेतृत्व करणार कोण?

sonia gandhi, congress, inc, indian national congress, sonia, gandhi, rajiv gandhi, rahul gandhi, priyanka, rahul

राजकीय भांडवल चिरंतन नसते. सोनिया गांधी या भारतीय राजकारणातील याचे एक प्रमुख उदाहरण होय.

कॉँग्रेस हा देशातील सर्वात जुना पक्ष आणि या पक्षाच्या अध्यक्षपदाचे काटेरी मुकुट सर्वात प्रदीर्घ काळ डोक्यावर पेलणार्‍या अध्यक्षांनी अखेर हे मुकुट काढून टाकले आणि यासाठी नवीन डोकी शोधण्याची सुचना केली.

मे 2014 च्या निवडणुका झाल्या आणि गेल्या अनेक वर्षांपासून सतत संघर्ष करीत असलेल्या कॉँग्रेस पक्षाची सत्ता एका क्षणात कोसळली, हे उल्लेखनीय. देशभरातील वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानांवर वर्षानुवर्षे वर्चस्व गाजविणाऱ्या या पक्षाच्या बातम्या आज मात्र कागदांच्या प्रचंड मोठ्या ढिगाऱ्याखाली गुदमरत आहेत. काही माध्यमे सत्ताधाऱ्यांचे भाट झाली आणि गांधी घराण्याच्या या सुनबाईंच्या मागे हात धुवून लागली आहेत. सोनियांचा जन्म इटलीच्या विसेन्झाजवळ एका छोट्याशा गावी झाला. रोमन कॅथोलिक कुटुंबात पालन पोषण झाले. स्थानिक शाळेत प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्या इंग्लंडच्या केंब्रिजला गेल्या. इथे राजीव भेटले, नंतर 1968 साली त्यांच्याशी लग्न करून आपल्या सासरी म्हणजे भारतात आपल्या सासु व तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी सोबत राहू लागल्या.

पती राजीव गांधी यांच्या कार्यकाळात सुद्धा त्या सार्वजनिक क्षेत्रापासून दोन पावले दूरच राहिल्या.

मात्र राजीव गांधी यांची हत्या झाली तेव्हा कॉँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पक्षाचे नेतृत्व करण्याचा आग्रह धरला. तरीही त्या तयार झाल्या नाही, अशातच 1997 उजाडले.

पक्षात खूपच आग्रह होऊ लागला आणि पुढच्या वर्षी त्या अध्यक्ष झाल्या. त्यांनी डाव्यांसोबत पक्षाची मोट बांधली आणि 2004 साली केंद्रात पुरोगामी लोकशाही आघाडी (पुलोआ) ची सत्ता स्थापन केली. परत 2009 च्या सार्वत्रिक निवडणुका जिंकल्या आणि दुसर्‍यांदा पुन्हा एकदा पुलोआ सरकार स्थापन केले. पुरोगामी लोकशाही आघाडी स्थापन करण्याचे मोठे श्रेय त्यांनाच देण्यात येते. 2004 च्या सार्वत्रिक निवडणुका जिंकून देखील त्यांनी पंतप्रधानपद सपशेल नाकारले आणि सत्तारुढ़ पक्षांचे व सल्लागार समितीचे नेतृत्व हाती घेतले. आपल्या कार्यकाळात सोनिया गांधींनी माहितीचा अधिकार, खाद्य सुरक्षा विधेयक आणि मनरेगा सारख्या योजना अमलात आणल्या.

याचे देखील श्रेय त्यांनाच. यातून बोफोर्स आणि नॅशनल हेराल्ड वरुन झालेल्या टिकांची झळ काहीशी कमी झाली.

त्यांच्या परदेशी मूल असण्याचा मुद्दा देखिल खूप गाजला. यावरुच महाराष्ट्राचे शरद पवार यांनी बंडाळी केली आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. पुलोआ सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळात प्रकृती साथ देत नसल्याने सोनियांचा सक्रिय राजकारणात सहभाग कमी होत गेला. डिसेंबर 2017 साली अध्यक्षपद सोडल्यावर ऑगस्ट 2019 मध्ये परत एकदा त्यांना पक्षाचे नेतृत्व सांभाळावे लागले. पूर्ण पक्ष आणि पक्ष संघटनेच्या सर्व तारा हाती असताना सुद्धा त्यांनी स्वतःसाठी कोणतेही लाभकारी पद घेतले नाही, हे ही विशेष. अत्यंत त्याग आणि धैर्याने पक्ष सांभाळला.

भाजपचा उदय का व कसा झाला, यावर एका पत्रात उत्तर देताना त्यांनी नरेंद्र मोदींना तरुणांनी मतदान केले आणि कॉंग्रेसने मात्र तरुण मतदार व त्याचा विश्वास गमावला असल्याची स्पष्ट काबुली देत, ही पक्षाच्या हितात गंभीर बाब आल्याचेही म्हणाल्या. सोनिया गांधी उर्फ मेनो यांनी एकोणीस वर्षे हे पद भूषविल्यावर 2004 ते 2019 पर्यंतच्या काळातील त्या देशातल्या सर्वात शक्तिशाली राजकारणी ओळखल्या गेल्या. फोर्ब्स मासिकाने सर्वात शक्तिशाली लोकांच्या यादीत त्यांचा समावेश केला.

2007 साली फोर्ब्स या मासिकात सोनियांना जगातील सर्वात जास्त शक्तिशाली असलेल्या लोकांत तिसर्‍या क्रमांकावर असल्याचे म्हटले आहे. 2013 साली याच मासिकाने त्या जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्तीत 9 व्या स्थानावर आणि जगातील सर्वात शक्तिशाली महिलांत 21 व्या स्थानावर असल्याचे म्हटले आहे.

फोर्ब्सच्या अहवालातील सामर्थ्यवान लोकांच्या यादीमध्ये त्या 2012 मध्ये त्या 12 व्या स्थानावर होत्या तसेच 2007 आणि 2008 सालापर्यंत त्यांचे नाव जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींमध्येही होते. ‘द वर्ल्ड्स 50 मोस्ट इन्फ्लुएंशियल फिगर्स’ च्या वार्षिक सर्वेक्षणात 29 व्या क्रमांकावर सोनियांना स्थान देण्यात आले. मात्र 2013 साली काळा पैसा आणि भ्रष्टाचाराच्या नावाखाली विरोधकांनी रान उठवले. यासाठी स्वच्छ प्रतिमा असलेले अण्णा हजारे आणि योग गुरु बाबा रामदेव यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजप आणि त्यांच्या राजकीय सगेसोयर्‍यांनी निशाना साधला.

दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या विरोधात निवडणूक लढविणारे आणि राजीव गांधी यांच्या हत्येच्या आरोपींची वकिली करणारे भाजपचे तत्कालीन नेते राम जेठमलानी यांच्या मुखावाटे पंतप्रधान पदासाठी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे नाव भाजपने पुढे केले. कॉंग्रेस आणि विशेष म्हणजे गांधी कुटुंबाविरुद्ध द्वेषाग्नीचा भडका उडवण्यासाठी भाजप व संघाने प्राण पणाला लावले. सोनियां गांधी यांचे नाजूक जागेचे दुखणे असलेल्या त्यांच्या जावयावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले आणि आपल्या जावयाला पाठीशी घालत असल्याचे आरोप सुद्धा करण्यात आले. भाजपच्या गुप्त हाती कासरा असलेल्या अण्णा हजारे यांच्या रामलीला मैदानावर गाजलेल्या आंदोलनाने अख्खा देश ढवळून निघाला आणि कॉँग्रेसच्या विरोधात मतदार पेटून उठला.

2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत कॉँग्रेसचा दारुण पराभव झाला.

जनतेसाठी एखादी उल्लेखनीय कामगिरी करण्याच्या अगर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याच्या आधारावर भाजपने 2014 च्या निवडणुका मुळीच जिंकलेल्या नसून केवळ कॉंग्रेस आणि खासकरुन गांधी कुटुंबाविरूद्ध नकारात्मक धारणा निर्माण करून जिंकल्या, हे विशेष.

मात्र सत्ता मिळूनही विरोधकांना विशेषतः भाजपला आजपर्यंत काळा पैसा बाहेर काढता आला नाही आणि भ्रष्टाचाराचा आरोपही सिद्ध करता आला नाही.

त्यांच्या जावयावर केलेले आरोप देखील हवेत विरून गेले.

इथून मात्र कॉंग्रेस पक्षाला उतरती कळा लागली. पराभवापूर्वीच पराभव मान्य करणार्‍या राहुल गांधींवर नाकर्तेपणाच्या टिकांचा सतत मारा करण्यात आला.

राजकारणात ते अजुनही आईच्या पदराशी बांधले गेलेले पप्पू असल्याची टवाळकी करण्यात आली.

अशा प्रकारातून आज कॉंग्रेस एका अत्यंत दयनीय व लाजिरवाण्या परिस्थितीला तोंड देत आहे.

मुळात सोनिया गांधी यांची राजकीय डावपेचाची एक स्वतंत्र स्टाइल आहे.

मात्र दुर्दैवाने आनुवंशिक रित्या निर्माण होणार्‍या इतर गुणधर्मा प्रमाणे ही स्टाइल मूळ नेतृत्वातल्या नव्या पिढीत आली नाही. सोनिया गांधींनी कॉंग्रेसची सूत्रे स्वीकारली तेव्हा पक्ष अंतिम घटका मोजत होता.

संघटन उद्ध्वस्त झाले होते. मात्र संपूर्ण देशात कॉँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ आणि मुरब्बी नेते होते.

संपुर्ण कॉँग्रेस परिवारास एकत्र करून त्याचे नेतृत्व गांधी कुटुंबाच्या हाती सोपविण्यासाठी त्यांचे आटोकाट प्रयत्न सुरू होते. स्व. राजीव गांधी यांच्या बलिदानामुळे सोनिया गांधींच्या भोवताली सहानुभूतीची प्रचंड वलये निर्माण झाली होती. मात्र कॉँग्रेस पक्षाचे राजकारण हे स्वतःच्या कुटुंबापुरतेच असते अशी एक प्रतिमा निर्माण करण्यात विरोधक यशस्वी झाले. यातूनच गांधी कुटुंबाविरुद्ध अगोदरच जळत असलेल्या नकारात्मकतेच्या आगीत आणखीन तेल ओतले गेले. परिणामी 2014 मधील निवडणुकीतही याचे पडसाद उमटले.

या पराभवानंतर पुढील पाच वर्षांत पक्षाची झालेली घसरण कदाचित भरून काढताही आली असती.

भाजपला त्याची जागा दाखवून देण्याच्या बर्‍याच संधी उपलब्ध झाल्या होत्या. मात्र कोणत्याही प्रकारचा कोणत्याही पक्षाशी समझोता न करण्याच्या अहंकाराला बळी पडून 2019 च्या निवडणुकीत सुद्धा 2014 पेक्षाही भयानक परिस्थितीला सामोरे जावे लागले. मजबूत असलेल्या जागा सुद्धा गमावल्या लागल्या. कित्येक राज्ये हातातुन निसटत गेली. एक प्रकारे, 2019 च्या निवडणुकीने राजकारणाचे सोनिया मॉडेल सपशेल नाकारले.

बर्‍याच जणांना प्रश्न पडला असेल की, या संपूर्ण कहानीत राहुल गांधी कुठे उभे होते?

तर मी म्हणेन की, एनएसयूआय आणि यूथ कांग्रेसच्या राजकारणात नाक खुपसत होते.

आधीच पडझड होत असलेल्या संघटना आणखीनच भुई सपाट होत करण्यात हातभार लावीत होते.

नव्या चेहऱ्यांना वाव देण्याऐवजी निवडणूक प्रक्रिया महाग करीत होते आणि आर्थिक ऐपत नसलेल्या निष्ठावंताना बाहेरचा रस्ता दाखवित होते.

Dr. Vaidehi
Dr. Vaidehihttp://www.vaidehisachin.com
न्यूजमेकर्स ब्रॉडकास्टींग कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या आठ वर्षापासून समूह संचालक आहेत. इंग्रजी दैनिक आफ्टरनून व्हॉईस, मराठी दैनिक मुंबई माणूस, मुंबई माणूस मराठी वेब पोर्टल च्या राजकीय पत्रकार कार्यरत आहेत. संशोधक पत्रकार, हॅकर्स म्हणून उत्तमप्रकारे काम केले आहेत. त्यांना विविध राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments