Friday, April 26, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखमाध्यमे, ग्लॅमर उद्योग, ड्रग्स आणि यामागील काळे वास्तव

माध्यमे, ग्लॅमर उद्योग, ड्रग्स आणि यामागील काळे वास्तव

Glamour, Drugs, Nepotism, Bollywood

संपलं! सगळं काही संपल्यासारखं झालं. आपली माध्यमं. गेल्या कित्येक वर्षांपासून आपली माध्यमं विचित्रच वागताहेत. विश्‍वास ठेवण्यासाठी माध्यमांजवळ काहीच शिल्लक राहिलं नाही आता. गुन्हेगारी जगताचे गुप्तचर अधिकारी हेच, हेरगिरी करणारे पक्के अधिकारी हेच, न्यायव्यवस्था हेच, कुणी गुन्हेगार आहे की निर्दोष आहे, हे ही सिद्ध करण्याचा ठेका घेतलेला यांनीच. आता एवढी कर्तुत्ववान माध्यमं ज्या देशात असतील, तिथं पोलीस, गुप्तचर खातं, न्याय व्यवस्था आणि न्यायाधीश इत्यादींची गरजच नाही. न्यूज अँकर चा एक एजेंडा ठरलेलाच असतो. हा एजेंडा पक्के मुरलेले राजकीय नेते आणि त्यांच्या सोयीच्या पत्रकारांनी मिळून तयार केलेला असतो. या अजेंड्याला अनुसरून बोलणार्‍याला इथं बोलायची भरपूर संधी उपलब्ध करून देण्यात येते. मात्र त्यांनी ठरविलेल्या एजेंड्याविरूद्ध जर कुणी तोंड उघडलं की तोंड उघडण्यापूर्वी त्याची मुस्कटदाबी केली नसेल तर मग ती माध्यमंच कसली? या दिवसांत काही माध्यमं एक तर एकच रडगाणं ऐकवीत आहेत, एक तर एकाच विषयाचा पूर्ण काथ्याकूट करताहेत.

टीवी उघडली की सुरू झाला प्राइम टाइम. एक चार पाच धंदेवाईक सिलेब्रेटीज घ्यायचे. त्यात इन मिन दोनच विषय घ्यायचे. बाकी दुसरा विषयच काढायचा नाही मुळी. एक तर बॉलिवूड आणि महाराष्ट्राचे राजकारण आणि दुसरा म्हणजे सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येपासून ते मेलं ड्रग्स आणि ठाकरे कुटुंबाच्या जन्म कुण्डली पर्यंत विषय घोळत चोथा करायचा. ऊबक आली, अक्षरशः किळस आली त्या माध्यमांची. वाटतं की नकोच ती दळभद्री माध्यमं. आजकाल सुशांत-रिया ड्रग्ज त्रिकोण आणि जया साहा वर एनसीबी तर्फे निर्माण करण्यात आलेले प्रश्न चिन्ह हे माध्यमांचा खुराक दर्शकांना प्रचंड डोकेदुखी ठरला आहे. कुणाच्या तरी आणि कुठल्या तरी पेल्यात ड्रग्सचे चार थेंबं टाकल्याचं काहीतरी प्रकरण तिच्या अंगलट आलं म्हणे. “चाय में 4 बूंदों का उपयोग करें, उसे इस में डुबो दें। इसे किक करने के लिए 30-40 मिनट दें …”, असा काही तरी संदेश 2019 सालचा आहे म्हणे. हे जोडपं प्रतिबंधित ड्रग्स संबंधीत बोलत होते, असं मात्र नंतर कळलं. केंद्रीय मादक द्रव्य विरोधी दस्त्याने अर्थात

एनसीबीने आतापर्यंत तब्बल डझनभर पेक्षाही जास्त लोकांना अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये सुशांत सिंह राजपूतची प्रेयसी अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्तीचा समवेश आहे. ड्रग्स पुरवठा करणार्‍या पूर्ण नेटवर्कचा

मागोवा घेत एनसीबीनं मुंबईसह गोव्यापर्यंत अनेक ठिकाणी छापे टाकले. ठीक आहे. एनसीबी आपलं काम करत आहे. मात्र माध्यमं राईचा पर्वत करीत आहेत. अनेकांवर हल्ले होताहेत. त्यांत दीपिका पदुकोण सुद्धा सुटली नाही. कशी काय सुटणार? जेएनयू मध्ये जाऊन डाव्या चळवळीच्या पीडित विद्यार्थ्यांना भेटून नव्हती का आली ती? मग केंद्रीय राजकारण्यांना सहन तरी कशी होणार ती? अगदी तेव्हापासुनच या सुशांत राजपूत आणि रिया च्या तयार स्क्रिप्ट मध्ये तिचं नाव देखील समाविष्ट न करण्याएवढा मूर्खपणा सत्ताधारी कसं काय करतील?

असो, तपास यंत्रणांना त्यांचं काम करूद्या. मीडिया ट्रायल करायची काय गरज आहे? एनसीबीतर्फे तपास कार्य अद्याप पूर्ण झालेलं नाही. कार्य पूर्ण झाल्यावर कोण दोषी आहे आणि कोण निर्दोष, हे समोर येईलच. पण त्या आधीच माध्यमं न्यायालयासारखे निर्णय देताहेत. सुशांत सिंह राजपूत-रिया चक्रवर्ती आणि संबंधित त्रिकोणासंबंधी एनसीबी दोन दृष्टिकोनांतून तपास करीत असल्याचं दिसून येतं. प्राथमिक दृष्ट्या 2019 साली बॉलीवुड पार्टी वीडियो संबंधी मनजिंदर सिंहच्या आधारावर. या पार्टीत बॉलिवूडच्या अनेक बडे बडे स्टार्स या पार्टीत सामील झालेले होते म्हणे. अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि सारा अली खानला या आठवड्यात एजेंसी मार्फत समन जारी करण्यात येणार असल्याचं सांगितलं जातं. रिया चक्रवर्तीच्या प्रश्नावरून सारा अली खानचं नाव समोर आलं होतं. 2008 साली, श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूर 38 तरुणीं आणि 240 तरुण होते. पोलिसांनी छापा टाकून त्यांना ताब्यात घेतलं होतं. मात्र वैद्यकीय चाचणी करून त्यांना सोडून देण्यात आलं होतं. त्यांच्या रक्ताचे नमुने फोरेंसिक तपासासाठी पाठविण्यात आले होते. मात्र त्यावेळी माध्यमं मूग गिळून गप्प होती. तसं पाहिलं तर मुंबईत हे काही नवीन नाही. बॉलिवूडच्या चंदेरी दुनियेत अनेक बडे बडे कलाकार ड्रग्सच्या आहारी गेलेले आहेत. हे सगळ्यांना माहीत आहे.

अंडरवर्ल्ड जगाशी संबंध आणि याबरोबरच ब्लॅक मनी लॉन्ड्रिंग देखील बॉलीवुडचं खुल्लमखुल्ला सत्य आहे. अनेक प्रसिद्ध स्टार्स, नटनट्यांचा कुप्रसिद्ध माफिया डॉन आणि अंडरवर्ल्ड कनेक्शन जगजाहीर आहे. तुम्ही एखादा फालतू नीच हलकट चित्रपट पाहिला का? तीन तास डोकं दाखविणार्‍या अशा चित्रपटा बाबत कशाला तयार केला असणार हा चित्रपट, असंही वाटलं असेलच. तर असले चित्रपट काळा पैसा पांढरा करण्यासाठी अगर मनी लॉन्ड्रिंग साथी तयार करण्यात आलेला असतो. शिवाय कॅज्युअल सेक्स देखील बॉलिवूडची एक अत्यंत काळी बाजू आहे. अफाट प्रसिद्धी आणि पैशांबरोबरच लिंक अप आणि ब्रेकअप, सेक्स पार्ट्या, हर प्रकारची मौज मस्ती हे नेहमीचच. चित्रपट सृष्टीत नैराश्य पूर्णजीवन पाचवीला पुजलेलं आहे. इथं कधी कुणी कुणाचा कायमस्वरूपी मित्रही नसतो आणि शत्रू देखील नसतो. आजकाल नटनट्या आपल्या राजकीयप्रवृत्तीस बळी पडून आपसात खूप भांडत आहेत. लोकांना प्रभावित करण्यासाठी वाट्टेल ते करीत आहेत. एक दुसर्‍यांवर नको ते आरोप, अपमानास्पद भाषेचा वापर करताहेत. आपण ज्याप्रमाणे मद्यप्राशन, अश्लीलता, द्वेष, मत्सर, कलह, भांडणं तंटे, हिंसा, पैसा आणि प्रसिद्धी साठी वाट्टेल ते करणे इत्यादी सारख्या बाबी चित्रपटात पाहतोच. यां बाबी त्यांच्या वास्तविक जीवनात देखील घडताहेत.

अंडरवर्ल्ड बरोबरच बॉलीवुडच्या नटनट्यांचे गहिरे संबंध अनेक राजकीय नेते, पोलीस अधिकारी सारख्यांशी असतात. संकटकाळी हे त्यांना सोडविण्यासाठी मदत करतात. या उपकाराची परतफेड म्हणून बर्‍याच नटनट्या राजकीय नेत्यांची देखील मदत करतात. किंबहुना राजकीय नेते त्यांचा सोयीस्कर वापर करून घेतात, असे म्हटले तर वावगे ठरू नये. ज्या नटनट्यांवर भाजपची कृपा दृष्टी आहे, त्या नटनट्या बिनधास्त झालेल्या आहेत आणि भाजपचे जोरदार समर्थन करीत वाट्टेल त्याला पाहिजे तसे लक्ष्य करतात. अगदी केंद्रीय मंत्र्यांची कृपादृष्टी असली तर मग वाय प्लस सुरक्षा देखील मिळते. शिवाय अशा नटनट्यांकडून प्रचारात तर भरपुर फायदा होतोच, मात्र एखाद्या वेळेस पक्षाच्या मेहेरबानीने लोकसभा, विधानसभा इत्यादीचे तिकीट मिळाले तर नशीब फळफळेल, असाही विचार करून पक्षाचा एजेंडा राबविण्यात ते धन्यता मानतात. करतात. रामायण आणि महाभारत टीव्ही सीरियल मध्ये काम करणार्‍या रूपा गांगुलीपासून ते आजपर्यंत याची असंख्य उदाहरणे देता येतील.

आजकाल एनसीबी अर्थात नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो तर्फे सुरू असलेल्या बॉलीवुड-ड्रग तपासात आपली माध्यमे सुशांत सिंहच्या आत्महत्या प्रकरणास कमी महत्व देत असून या तुलनेत ड्रग्सला अधिक महत्व देताना दिसताहेत. माध्यमं उद्या जर सुशांतलाच विसरली तर त्यात नवल वाटायला नको. कारण माध्यमे ही पत्रकारिता नसून राजकीय फायद्यासाठी चालविली जातात, आणि बॉलीवूड नटनट्यांचा सर्रास वापर केला जातो, हे विसरून चालणार नाही. मुळात ड्रग्स हे काही सुशांतच्या मृत्यूचे मुख्य कारण नाही. रिया चक्रवर्तीला ड्रग्स प्रकरणी झालेली अटक हे तपास यंत्रणेचं यशच म्हणावं. मात्र हे यश केवळ सुशांतच्या मृत्यूशी संबंधित नसून ड्रग्सशी संबंधित आहे. यावरून माध्यमांनी सुशांतला सोडून आपला सगळा फोकस ड्रग्सवर मारलेला दिसतो. सुशांत सिंह आणि त्याच्या बहिणी त्याच्या मृत्यूचा शेवटच्या घटनाक्रमासंबंधी खूप हलकल्लोळ माजवत होत्या. मात्र आता सुशांतचे कुटुंबिय, त्याचा वकील, बिहार पोलीस आणि माध्यमे चिडीचूप आहेत. कारण हे एक खोटे नाटक आहे आणि यावर तोंड उघडून आपली नाचक्की करून घेण्यासाठी आणि तोंडघशी पडण्यास ते तयार नाहीत. आता टीआरपी लाटण्यासाठी आयते वयते ड्रग्स प्रकरण एखादे घबाड हाती लागल्यासारखे लागले आहे. म्हणुन आता माध्यमांना सुशांतपेक्षा ड्रग्स जास्त दिसत आहे. आता या विषयाचा माध्यमे टीआरपी साठी किती दिवस वापर करतात, आणि किती काथ्याकूट करतात, हे पाहणे मजेशीर ठरेल.

Dr. Vaidehi
Dr. Vaidehihttp://www.vaidehisachin.com
न्यूजमेकर्स ब्रॉडकास्टींग कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या आठ वर्षापासून समूह संचालक आहेत. इंग्रजी दैनिक आफ्टरनून व्हॉईस, मराठी दैनिक मुंबई माणूस, मुंबई माणूस मराठी वेब पोर्टल च्या राजकीय पत्रकार कार्यरत आहेत. संशोधक पत्रकार, हॅकर्स म्हणून उत्तमप्रकारे काम केले आहेत. त्यांना विविध राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments