महाराष्ट्रातले भिडू गुजरातमध्ये भिडणार!

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या होमपीचवर म्हणजेच गुजरातमध्ये विधानसभा निवडणूकीचे रणशिंग फुंकले गेलेले आहे. होमपीचवर जिंकण्यासाठी दस्तुरखुद्द पंतप्रधान मोदींनी सर्व शक्तीपणाला लावली आहे. मात्र याच होमपीचवर त्यांना टक्कर देण्यासाठी सत्तेतील त्यांचाच भिडू शिवसेना त्यांच्याच विरुध्द गुजरातमध्ये भिडणार. शिवसेनेच्या गुजरात एंट्रीने हिंदू मतांचे विभाजन होऊन भाजपाला फटका बसण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये भाजपा समोर आधीच व्यापारी, पाटीदार समाजाची दोन मोठी आव्हाने होती. त्याचबरोबर सर्वात प्रबळ विरोधी पक्ष काँग्रेसने थेट पंतप्रधान मोदींना टार्गेट केल्यामुळे भाजपाला प्रचारामध्ये उत्तरे देत नाकीनऊ आले. अशा सर्व परस्थितीत शिवसेनेने गुजरात निवडणूकीत उमेदवार देण्याची जाहीर करुन भाजपाच्या चिंतेत वाढ केली. गुजरातमध्ये व्यापारी वर्ग हा वस्तू सेवा कर (जीएसटी) मुळे सरकारवर नाराज असून व्यापाऱ्यांना व्यापारामध्ये ६० टक्के फटका बसलेला आहे. व्यापाऱ्यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना जीएसटीच्या चुकीच्या धोरणामुळे त्रास होत आहे काही मार्ग काढा असे सांगून सुध्दा काही अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये संताप आहे. व्यापाऱ्यांनी १५ दिवस आपले व्यवहार बंद ठेवून सरकारचा निषेध नोंदवला होता. तर दुसरीकडे पाटीदार समाजाला शासकीय नोकऱ्या,शिक्षणात आरक्षण मिळावे यासाठी त्यांच्याही मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. तसेच  आंदोलन करणाऱ्या पाटीदार लोकांवर गोळीबार करण्यात आला होता. तसेच आंदोलन कर्त्यांवर विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. पाटीदार समाजाचा तरुण नेता हार्दीक पटेल यालाही तुरुंगात डांबण्यात आले होते. या सर्व घडामोडी भाजपाला त्रासदायक असून शिवसेनेने गुजरातमध्ये उमेदवारी देण्याची घोषणा केली. काही दिवसापूर्वीच पाटीदार नेता हार्दिक पटेल यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची मातोश्रीवर येऊन भेट घेतली होती. पटेल यांनी शिवसेनेला समर्थन करण्याची भूमिका स्पष्ट केली नाही. पटेल आणि ठाकरे कुटुंबियांचे मधुर संबंध आहेत. पटेल सध्या तरी भाजपाच्या विरोधात वेगवेगळी विधाने करुन एकाप्रकारे काँग्रेसला झुकता माप देत आहेत. काँग्रेस सोबत काही मुद्यांवर पाठिंबा देण्यावरुन चर्चाही झाली. आरक्षणावरुनही तडजोड सुरु आहे. अशा सर्व गुंतागुतीच्या राजकारणात सध्यातरी काँग्रेसचे पारडे जड होत असतांना शिवसेनेने गुजरातमध्ये उडी घेतल्यामुळे भाजपाला त्याचा फटका बसू शकतो व महाराष्ट्रात दोन्ही पक्षातील जे संबंध आहेत ते  अजुन ताणण्याची शक्यता आहे.

- Advertisement -