Saturday, April 27, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखयोगीला फटकारले!

योगीला फटकारले!

णावा येथील संतापजनक घटनेत आरोपी आमदाराला वाचवणाऱ्या योगी सरकारला अलाहाबाद न्यायालयाने फटकारले आणि योगी बोलायला लागले. सीबाआईने आमदार कुलदिपसिंह सैंगरला ताब्यात घेतले. तीन गुन्हे दाखल झाले. परंतु ही एकच घटना नाही तर दोन वेगवेगळ्या घटना घडल्या. एका राज्यात भाजप सत्तेतला भागीदार, तर दुसरीकडे प्रचंड बहुमत. दोन्ही राज्यांतल्या जनतेला परिवर्तन हवे होते. नवी पारदर्शी व्यवस्था हवी होती. भ्रष्टाचाररहित, गुन्हेगारमुक्त, जगण्याचे स्वातंत्र्य असलेली. आपल्या मुलाबाळांना खुलेपणाचा श्वास देणारी. त्यांना त्यांचे स्वातंत्र्य मनसोक्त उपभोगू देणारी. त्यांच्या स्वप्नांना उभारी देणारी. म्हणून त्यांनी यांना निवडून दिले. पण धर्माच्या, झुंडशाहीच्या राजकारणात या साऱ्या केवळ कल्पनाच राहिल्या. स्वप्नं उद्ध्वस्त झाली. जम्मू व काश्मीर राज्यातल्या कथुआ जिल्ह्यातील आठ वर्षांची आसिफा ही मेंढपाळ मुलगी. बकरवाल समाज शेकडो वर्षांपासून काश्मीर खोऱ्यातल्या जंगलात पशुपालनाचा व्यवसाय करतो. ऋतू बदलेल तसा हा समाज आपला बाडबिस्तार गुंडाळून स्थलांतर करत असतो. या समाजाला काश्मीर खोऱ्यातून हुसकावण्यासाठी एक मोठे कारस्थान रचले जाते. त्यात चिमुरड्या आसिफाला लक्ष्य करत हिंदू-मुस्लिम असा रंग मिसळला जातो. जंगलात निर्जन ठिकाणी गुरं चरायला नेली असताना आसिफाचे अपहरण केले जाते व तिला गुंगी येणाऱ्या गोळ्या जबरदस्तीने देऊन आठ जणांकडून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला जातो. बलात्कार करणारे इतके नीच व नराधम वृत्तीचे की मंदिरातही तिच्यावर तीन वेळा बलात्कार करण्यापर्यंत मजल जाते. एक सरकारी अधिकारी (जो मुख्य आरोपी आहे) व दोन पोलिस या नीच कृत्यात सहभागी असतात. या प्रकरणाची बाहेर वाच्यता होऊ नये म्हणून आसिफाचा दगडाने ठेचून खून केला जातो. जम्मू-काश्मीरमध्ये सत्तापरिवर्तन झाल्यानंतर या राज्यात हिंदू-मुस्लिम तेढ अधिक वाढवण्यासाठी अनेक कटकारस्थाने रचली जात आहेत. त्यापैकी हे एक. गेले तीन महिने हे प्रकरण जम्मू-काश्मीरचे राजकारण-समाजजीवन घुसळून काढत आहे. सर्वसामान्यांचा संताप पाहून सरकारने सर्व आरोपींना पकडून त्यांच्याविरोधात चार्जशीट दाखल करण्याचा प्रयत्न केला खरा, पण अशी चार्जशीट दाखल होऊ नये म्हणून जम्मूमधील वकिलांची एक झुंडशाही भाजप कार्यकर्त्यांसह रस्त्यावर येते, बलात्काऱ्यांचा बचाव करण्यासाठी हिंदू एकता मंच जन्मास येतो, न्यायालयासमोर जय श्रीरामाच्या, भारतमातेच्या घोषणा दिल्या जातात, तिरंगा फडकवला जातो. बलात्काऱ्यांचे समर्थन करणारे पोलिसांवर पक्षपाती ते हिंदूविरोधी असल्याचा आरोप बेधडकपणे करतात. जे पोलिस काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांच्या विरोधात प्राणपणाने लढा देत आहेत त्यांना देशद्रोही ठरवले जाते. बलात्काऱ्यांना वाचवण्यासाठी काश्मीरमध्ये जशी झुंडशाही रस्त्यावर उतरली तसे वातावरण उत्तर प्रदेशात दिसून आले. उन्नावमधील १६ वर्षांच्या तरुणीची कहाणीही आसिफासारखी हृदयद्रावक व संतापाने मन सैरभैर होणारी व नंतर एक प्रकारची हतबलता आणणारी. येथे संपूर्ण भाजप पक्ष, योगी आदित्यनाथ यांचे सरकार १६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेले भाजपचे आमदार कुलदीप सेंगर यांच्या बचावासाठी शर्थीचे प्रयत्न करताना आढळले. या तरुणीचे वडील आमदारांच्या घरात काम करणारे. मुलीवर बाहेरच्या वातावरणाचा परिणाम होतोय म्हणून आमदारांनी तिची शाळा बंद केली व तिच्यावर एकेदिवशी बलात्कार केला. मुलीने बाहेर वाच्यता करू नये म्हणून तिच्यावर पाळत ठेवण्यात आली. तिने पोलिसांमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी साधी तक्रारही दाखल केली नाही. आपले म्हणणे कोणी ऐकत नाही हे पाहून तरुणीने थेट मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आत्मदहनाचा निर्णय घेतला तेव्हा देशातल्या सर्व मीडियाचे तिच्याकडे लक्ष गेले. दरम्यान मुलीचे वडील पोलिसांकडे आमदारांविरोधात तक्रार घेऊन गेले तेव्हा पोलिसांनी त्यांनाच तुरुंगात डांबले. कोठडीत त्यांना जबर मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्या निष्पाप मुलीला बापावर झालेल्या अन्यायासाठी रस्त्यावर यावे लागले. लोकदबाव, प्रसारमाध्यमांचे वृत्तांकन, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयामुळे आमदाराविरोधात अनेक दिवसांनंतर गुन्हा दाखल झाला, पण हे आमदार महाशय श्रीरामावरही आरोप झाले, असे जाहीरपणे बोलू लागले. त्यांना अटक करण्यासाठी एसआयटीचे पथक गेले तेव्हा त्यांना रोखण्यासाठी आमदारांचे शेकडो समर्थक रस्त्यावर उतरले. योगी आदित्यनाथ यांचे सरकार आल्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये असा एकही दिवस जात नाही की तेथून हिंदू-मुस्लिम जातीय तेढ, दलितांवरचे हल्ले, मुलांचे बळी यांच्या बातम्या येत नाहीत. रामनवमीच्या निमित्ताने उग्र हिंदू अस्मितेचे राजकारण या देशाने पाहिले. आता अशाच धार्मिक अस्मितांच्या नावाखाली बलात्काऱ्यांचे समर्थन करणारी एक नवी झुंडशाही रस्त्यावर उतरत आहे. बेटी पढाओ, बेटी बचाओ, अशा घोषणा पंतप्रधान देतात पण भाजपच्या झेंड्याखालील गावगुंडांना ते रोखू शकत नाहीत, हे संतापजनक आहे. उशीरा का होईना आता पंतप्रधान आज बोलले पीडितांना न्याय मिळेल. परंतु आधीच आरोपींवर कारवाई झाली असतीतर एका पीडितेच्या वडिलांची हत्या झाली नसती. तर दुसऱ्या घटनेत आरोपींना वाचवणाऱे मोकाट सुटले नसते.

वैदेही तामण
मुख्य संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments